भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्य आणि गुलामगिरी

भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्य आणि गुलामगिरी या गुंतागुंतीच्या आणि सापेक्ष गोष्टी आहेत. भारताला निर्विवाद स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. अर्थात यावरही काही लोकांचा आक्षेप आहे. पण ती गोष्ट बाजूला ठेवू. 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामीत होता हे सत्य आहे. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की, इंग्रज भारतात येण्यापूर्वी तरी भारत स्वतंत्र होता काय? याचे उत्तर देणे एवढी सोपी गोष्ट नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वानाच्या मते भारताचा इतिहास हा निरंतर पराभवाचा आणि गुलामगिरीचा इतिहास आहे. म्हणजे भारत याआधी कधीच स्वतंत्र नव्हता. सावरकरांच्या मते, भारतात मुस्लिम राजवटी येण्याअगोदर भारत स्वतंत्र होता. मध्यंतरी मुस्लिम राजवटींच्या काळात तो पारतंत्र्यात गेला. पुन्हा मराठ्यांनी तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र केला. पण नंतर इंग्रजांनी मराठ्यांना हरवून पुन्हा भारत गुलाम केला. मुसलमान इतिहासकारांच्या मते भारत इंग्रजांच्या काळात म्हणजे फक्त दीडशे वर्षे गुलामीत होता. बाकी काळ तो स्वतंत्रच होता.
    एकाच भारताच्या इतिहासाविषयी अशी तीन मते का दिसतात. याचे कारण लोकांच्या वेगवेगळ्या समूहानुसार स्वातंत्र्य वेगवेगळे होते. भारतीय समाज हा एक नाही. त्याच्यात चार वर्ण, हजारो जाती, आणि जमाती आहेत. या प्रत्येकाचा इतिहास आणि गुलामगिरी वेगवेगळी आहे. उदाहरण म्हणून आपण सवर्ण, अस्पृश्य आणि आदिवासी यांच्याविषयी विवेचन करू.
प्राचीन इतिहासात सवर्णांमध्ये चार प्रकार होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तेव्हा जाती नव्हत्या, अस्पृश्यता नव्हती. फक्त वर्ण होते. हे आपणास ऋग्वेदापासून महाभारतापर्यंत अभ्यास केल्यास लक्षात येईल. शूद्र म्हणजे अस्पृश्य नव्हे हे नीट लक्षात घेतले पाहिजे.
    त्याकाळी शूद्र गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडले होते. त्या काळात वरचे तीन वर्ण स्वतंत्र होते पण शूद्र गुलाम होते. त्यामुळे शूद्रांच्या दृष्टीने या काळात भारत स्वतंत्र नव्हता. मात्र त्रैवर्णिकांच्या दृष्टीने तो स्वतंत्रच होता.
    बौद्ध धर्माच्या उदयानंतर शूद्रांची गुलामगिरी हळू हळू संपत चालली. त्यानंतरच्या दीडशे वर्षातच शूद्र राजे झाले. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, हे भारतातील शक्तीशाली सम्राट शूद्र होते. महाराष्ट्रात 450 चाललेली आणि शक्तिमान अशी सातवाहनांची राजवट होती. सातवाहन शूद्र होते.
   यामुळे शूद्र हे पाच हजार वर्षांपासून गुलाम आहेत असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
   शूद्र राजे होणे हे ब्राह्मणांना मान्य होणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात पुष्यमित्र शुंग याच्या नेतृत्वाखाली प्रचंड बंड पुकारून बौद्ध राजा बृहद्रथ याची हत्या करून वैदिक राज्याची द्वाही फिरवली.
शूद्रांना दबवण्यासाठी ब्राह्मणांनी पराकाष्ठा केली. मनुस्मृतीसारखे भयानक ग्रंथ तयार करून ते शूद्रांवर लादले. जे सम्राट होते, राज्यकर्ते होते, त्यांना गुलाम बनविले.
     पण उत्तर भारतात हे चालू असताना महाराष्ट्रात शूद्र  सातवाहनांची सत्ता सुरू झाली होती. तात्पर्य एकीकडे शूद्र गुलाम केले जात होते तर दुसरीकडे त्यांची साम्राज्ये स्थापन  होत होती.
     शूद्र राजेच होते, त्यामुळे त्यांना गुलाम करणे हे ब्राह्मणांना शक्य नव्हते. अशारितीने शूद्रांचे उत्थापनझाले. जसे शूद्र राजे होते तसे क्षत्रियही राजे होते.
क्षुद्र राजे आणि क्षत्रिय राजे यांच्या घनघोर संघर्षही झाले आहेत.
     काही शूद्र राजे, सैनिक असले तरी, बरेच शूद्र शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार होते.
   माझ्या मते शूद्रांना श्रेष्ठत्व येण्याच्या काळातच किंवा त्यानंतरच्या काळात अस्पृश्यता निर्माण झाली असावी.
बुद्ध काळापूर्वी जे झाले असेल ते झाले असेल. पण बुद्धोत्तर काळात शुंग राजवटी, काही ब्राह्मण राजवटी आणि सनातनी क्षत्रिय राजवटी वगळता इतर राज्यांत शूद्रांचे फारसे हाल झाले असावेत असे वाटत नाही.
    पण अस्पृश्यांचे तसे नाही. त्यांच्या उदयापासूनच ते गुलामगिरीत होते. 1949 मध्ये ते गुलामगिरीतून कायद्याने मुक्त झाले.
      यावरून असे दिसते की प्रत्येक समूहाच्या गुलामगिरीचे स्वरूप वेगळे आहे. सुरूवातीला त्रैवर्णिक स्वतंत्र होते पण शूद्र गुलाम होते. बुद्धोत्तर काळात हळू हळू शूद्रही गुलामगिरीतून मुक्त होऊ लागले. तेव्हा अस्पृश्य गुलाम झाले. हा एक अनुक्रमच होता. शूद्र हे त्रैवर्णिकांचे गुलाम होते. त्याच वेळीअस्पृश्य हे शूद्र आणि त्रैवर्णिक या दोन्हींचे गुलाम होते. पुढे शूद्र राजे झाले तेव्हा त्यांनी अस्पृशांवर अत्याचार केले आहेत. ही भारतीय सामाजिक इतिहासातील एक दुर्लक्षित बाब आहे.
      भटके आणि आदिवासी यांचा विषयच वेगळा आहे. ते यांच्या गुलामगिरीत कधीच नव्हते.
     देशात मुसलमान आल्यावर परिस्थिती खूपच बदलली. ज्या त्रैवर्णिकांनी शूद्रांना गुलाम आणि अस्पृश्यांना गुलामांचे गुलाम बनविले होते त्या त्रैवर्णिकांवरच मुसलमानांचे गुलाम होण्याची पाळी आली. दुसर्‍यांना गुलाम ठेवण्यात त्यांना आनंद वाटत होता पण तेच स्वतः गुलाम झाल्यावर त्यांना गुलामगिरीच्या झळा कळाल्या. पण तरीही त्यांनी शूद्र आणि अस्पृश्यांना गुलामगिरी तून मुक्त केले नाही. गुलामगिरीची ही उतरंडच तयार झाली. यात पूर्वीही अस्पृश्य तळाला होते. आताही तळालाच राहिले. राज्य ब्राह्मणाचे अस, क्षत्रियाचे असो, शूद्राचे असो की मुसलमानांचे असो, अस्पृश्य गुलामच राहिले.
    शिवाजी महाराजांनी हिंदूंना ( त्रैवर्णिक, शूद्र आणि अस्पृश्य) यांना मुस्लिमांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.  पुढे मराठेशाहीत देशातील 75 टक्के भूभागावरील मुसलमानांना मराठ्यांच्याच अधीन  व्हावे लागले. जेथे बादशहाच मराठ्यांच्या अधीन झाला तिथे इतरांचे काय?  मराठा सत्ता तेथे मुस्लिम दुय्यम आणि जिथे मुस्लिम सत्ता तेथे हिंदू गुलाम अशी अवस्था झाली. मराठ्यांच्या काळातही शुजाउद्दौला, निजाम आणि हैदर/ टिपू यांची राज्ये बळकट होती.
    मराठा काळात शूद्रांना बरे दिवस आले. पण शिवकाळाचा अपवाद वगळता अस्पृश्यांची स्थिती पशूंपेक्षा बदतर झाली.
    अशा अवस्थेत इंग्रजांनी भारताचा ताबा घेतला. इंग्रजांना भारत जिंकायलाच शंभर वर्षे लागली. इंग्रजांनी भारत ताब्यात घेतल्यावर मात्र, हिंदू, मुसलमान, अस्पृश्य, आदिवासी सगळेच गुलाम झाले. त्यामुळे यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. विशेष म्हणजे आदिवासींनीही उठाव केले. 1857 चा उठाव हा सर्वात मोठा उठाव होता. पण तो ही इंग्रजांनी दडपला.
    यामुळे हिंदू, मुसलमान, आदिवासी यांचे स्वातंत्र्य नष्ट झाले. अस्पृश्यांना स्वातंत्र्यच नव्हते. त्यामुळे ते मुसलमान असो काय किंवा इंग्रज असो काय? त्यांच्या गुलामगिरीत फरक पडण्याचे कारणच नव्हते. उलट इंग्रजांच्या काळात त्यांच्या उन्नतीला वाव मिळाला.
    जेव्हा भारत 1947 साली स्वतंत्र झाला तेव्हाच तत्त्वतः सर्वांना स्वातंत्र्य मिळाले. त्या अगोदर संपूर्ण भारत कधीच स्वतंत्र नव्हता.
     ठराविक लोकांचे स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण देशाचे स्वातंत्र्य नव्हे. एक स्वतंत्र आणि दुसरा गुलाम असे असणे म्हणजे देश स्वतंत्र असणे नव्हे. त्यामुळे या देशात वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळा इतिहास आहे. त्रैवर्णिकांचा इतिहास म्हणजे शूद्रांचा इतिहास नसतो. शूद्रांचा इतिहास म्हणजे अस्पृश्यांचा इतिहास नसतो. मुसलमानांचा इतिहास हा हिंदूंच्या गुलामीचा इतिहास असतो. आणि इंग्रजांचा इतिहास सर्वांच्याच गुलामीचा इतिहास असतो. घटना समान असल्या तरी अन्वयार्थ बदलत असतात.
   

टिप्पण्या